Book Roof Online Book Store

Book Roof Online Book Store Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from Book Roof Online Book Store, Book shop, Pune.

१) माझ्या दुर्गाबाई- प्रतिभा रानडे: ₹. २७५/- ( नवेकोरे पुस्तक, मूळ किंमत- ₹. ३५०/-, प्रकार- चरित्र, आठवणी, किस्से, व्यक्...
16/04/2026

१) माझ्या दुर्गाबाई- प्रतिभा रानडे: ₹. २७५/- ( नवेकोरे पुस्तक, मूळ किंमत- ₹. ३५०/-, प्रकार- चरित्र, आठवणी, किस्से, व्यक्तिदर्शन, ललित, माहितीपर )

( माणूस स्वतःशी सुसंगत नाही झाला तर तो कुणाशीही सुसंगत होत नाही.” बाई स्वतःशी सुसंगत होत्या, तिथूनच त्यांना उर्जा मिळाली असावी.
बाई एकदा मला म्हणाल्या होत्या “मला जगण्यात सुख वाटतं बघ." यामागचं कारण याबद्दल मला वाटतं बाईंना जगाबद्दल, जगण्याबद्दल प्रचंड ओढ, कुतुहल होते. ऐन तारुण्यात ओढवलेल्या जीवावरच्या दुखण्यातून आश्चर्यकारक रीतीने त्या बऱ्या झाल्या होत्या. तेव्हा उजाडलेला प्रत्येक दिवस म्हणजे त्यांना इश्वराने दिलेली देणगी वाटला होता. प्रत्येक दिवस त्या उत्साहाने जगल्या. साडीचे काठ असोत, अचानकच आभाळात दिसणारा चंद्र त्याचं प्रतिबिंब आणि त्या प्रतिबिंबाची सावली असो की कुंडीतल्या मरू घातलेल्या रोपाला फुटलेलं कोवळं, नवं चिमुकलं पान असो, सगळ्याचा आनंद त्या साजरा करीत. तसेच कोणाचे वागणे बोलणे त्यांना पटले नाही तर त्या त्यांचाही खरपूस समाचार घेत. )
०००

२) धगधगते शेजारी- प्रतिभा रानडे: ₹. २००/- ( नवेकोरे पुस्तक, मूळ किंमत- ₹. २७५/-, प्रकार- ऐतिहासिक वाटचाल, सामाजिक, संस्कृतीदर्शन, लोकजीवन, राजकीय, ऐतिहासिक, माहितीपर, अभ्यास, मागोवा )

( अफगाणिस्थानातील सगळंच राजकारण एकमेकांना जिवे मारण्याचं, 'सफाया' करण्याचं. म्हणजे सगळ्या कुटुंबालाच मारून टाकण्याचं, आणीबाणीनंतर इंदिरा गांधी निवडणुकीत हरल्या तेव्हा गुल अमिरने, आमच्या ड्रायव्हरने, मोठ्या काळजीने विचारलं होतं की, 'आता इंदिरा गांधींचा पण ‘सफाया' करतील का ? सफाया केला नाही तरी त्या, त्यांची मुलंबाळं जगतील कशी? त्यांच्या उदरभरणाची सोय काय ?'
त्या वेळेस त्या प्रश्नांची उत्तरं देताना मला अभिमान वाटला होता की, आमच्याकडे लोकशाही आहे; आमच्याकडे तुमच्यासारखी मारामारी होत नाही. 'आम्ही' आणि 'ते' हा फरक तेव्हा जाणवला होता.
आज मात्र ठामपणानं तसं काही वाटतें नाही. आज असं वाटत आहे की. सत्तेवर येण्यासाठी कोणी बंदूका आणि रणगाडे वापरतात तर कोणी मतं आणि पैसा यांची कोट्यवधींची गणितं मांडतात. त्यामध्ये आता गुंडगिरीची भर पडत आहे. साधनं कोणतीही असली तरी सर्वसामान्यांच्या आयुष्याची धूळधाणच होते. बंदुका,रणगाड्यांमुळे माणूस मरूनच जातो. गणितांच्यामुळे माणूस जगत राहतो; पण जीवनावरचा त्याचा विश्वास उडतो. साम, न्याय, नेकी हे दूर कुठेतरी फेकले जातात. या खेळामध्ये फक्त राजकीय सत्तेसाठी हपापलेलेच गुंतलेले असतात असे नाही; तर समाजाची सदसद्विवेकबुद्धी जागृत ठेवण्याची जबाबदारी असलेलेही आहेत. सर्वसामान्य माणूस दिशाहीन अवस्थेत, तत्काल फायद्यासाठी चुकीच्या मार्गाने जाऊ लागतो. नाहीतर सर्वच बाबतीत उदासीन, तटस्थ होऊन जातो. हतबल होतो. सत्तासंपादनाची अमर्याद उर्मी आणि हतबलता यांची घट्ट वीण तयार होत जाते.. )
०००

📨पोस्टेज वेगळे.

📞संपर्क क्रमांक :-
Book Roof Online Book Store:-
+91 87998 21809, पुणे .

⚠️महत्वाची सूचना :-
(हा बुक रूफ चा एकमेव व्हॉट्स ॲप आणि संपर्क नंबर आहे. पुस्तके हवी असल्यास तसेच अधिक माहितीसाठी यावर मेसेज किंवा थेट संपर्क करावा. कमेंट मध्ये कोणीही मोबाईल नंबर देऊ नयेत, कृपया सर्वांनी ही काळजी घ्यावी ही विनंती. धन्यवाद)
०००

🔹अनुवादित रहस्यकादंबरी/कथासंग्रह सवलतीत उपलब्ध !!१.सो व्हॉट हॅपन्स टू मी ? -₹३७५/-(मूळ किंमत  ₹५३०/-, प्रकार -रहस्य/थरार...
12/03/2026

🔹अनुवादित रहस्यकादंबरी/कथासंग्रह सवलतीत उपलब्ध !!

१.सो व्हॉट हॅपन्स टू मी ? -₹३७५/-
(मूळ किंमत ₹५३०/-, प्रकार -रहस्य/थरार कादंबरी,पाने २५६ )
मूळ लेखक : जेम्स हॅडली चेस
स्वैर अनुवाद : अरुण डावखरे

आजकाल विमानांचे अपहरण करणे ही एक फॅशन झालेली आहे. कर्नल बर्नी ओल्सन हा युद्धात बॉम्ब टाकणारा एक वैमानिक ! त्याने व्हिएटनाम युद्धात भाग घेतलेला.
त्याने एक कोटी डॉलर किमतीच्या विमानाचे अपहरण करण्याची योजना आखली.
त्याने जॅक क्रेनला त्यासाठी बोलावणे पाठविले. तो युद्धात ओल्सनच्या हाताखाली मॅकॅनिक होता. क्रेनला गुन्हेगारी पार्श्वभूमी होती, हे कर्नल ओल्सनला माहित होते. जॅक क्रेन ती योजना यशस्वी करेल, याची ओल्सनला खात्रीही वाटली.
एका किमती विमानाचे अपहरण !

खरं तर ही जेम्स हॅडलीची कादंबरी! यात नेहमीसारखी सरळ साधी घटना नाही. संडे ओब्झर्व्हरने म्हटले आहे - ‘ही कादंबरी वाचताना वेडेपणाचाही अनुभव येईल.' सुरवातीपासूनच उत्कंठता वाढवणारी आणि शेवट संपल्यानंतरच खाली ठेवावी अशी ही कादंबरी...
०००

२.मृत्युची रात्र व इतर कथा -₹ ३७५/-
(मूळ किंमत ₹५३०/- ,अनुवादित रहस्य कथासंग्रह,पाने २५६)
मूळ लेखिका : पर्ल बक
अनुवाद : साधना सराफ

यातील एकेक कथा म्हणजे समुद्राचा तळ ढवळून काढलेले वेचक मोती आहेत. प्रत्येक कथेचा विषय वेगळा, जीवनाच्या वेगवेगळ्या पैलूंना स्पर्श करणाऱ्या या कथा आपल्याही मनाचा तळ ढवळून काढतात.
एका कथेत एका लावण्यवतीला बघितल्यावर एका कुरुप स्त्रीवर त्याचा कसा परिणाम होतो याचा धांडोळा घेताना त्या स्त्रीच्या मनात जणू काही उतरून बघितल्यासारखं वर्णन. दुसऱ्या एका कथेत नुकत्याच युद्धावरून घरी परतलेल्या तरुणाच्या मनाची घालमेल अशीच प्रत्यक्ष मनात बघून वर्णन केल्यासारखी, तर आणखी एका कथेत अणूबाँब बनवणाऱ्या टीममधल्या मुख्य शास्त्रज्ञाच्या मनातील व्यथेचा घेतलेला मागोवा. काही कथा आपल्या डोळ्यात पाणी आणतात तर काही मानवी स्वभावाचे विविध पैलू दाखवून थक्क करतात!
वाचकांनाही या कथा माझ्या इतक्याच आवडतील अशी आशा व्यक्त करते.
- साधना सराफ
०००

३.रेज द टायटॅनिक - ₹७२५/-
(मूळ किंमत ₹१०५०/-, पाने ४८८,रहस्य/थरार कादंबरी )
मूळ लेखक- क्लीव कुसलर
अनुवाद - अरुण डावखरे

१५ एप्रिल १९१२...
अमावस्येच्या काळ्या रात्री ते जहाज महाकाय हिमनगाला धडकून जलसमाधिस्त होते.... ७३ वर्षानंतर त्या विस्मृत शोकांतिकेला जागं केलं जातं... कारण त्या जहाजाच्या 'व्हॉल्ट'मध्ये दडलेलं होतं मौल्यवान खनिज- 'बायझोनिअम' ! ते दुर्दैवी जहाज होतं टायटॅनिक ! संरक्षण सिद्धतेस उपयुक्त खनिज बायझोनिअमच्या प्राप्तीसाठी सुरु जीवघेणा संघर्ष.... होतो
बलशाली अमेरिका आणि रशिया यांच्यातला संघर्ष... शह-काटशह, धाडसी मोहिमा, वेगवान घटना, रहस्ये वाचकाला शेवटपर्यंत खिळवून ठेवतात, श्वास रोखून धरायला लावतात.
०००

४.वूमन इन व्हाईट - ₹७९०/-
(मूळ किंमत ₹१,१३०/-, पाने ५४८,रहस्य कादंबरी )
मूळ लेखक -विल्की कोलिन्स
अनुवाद - आनंद ठाकूर

मी बाजूला वळलो. खाली मला ते एकाकी चर्च दिसत होते. तिथल्या द्वारमंडपातच मी त्या शुभ्रवस्त्रांकितेची - 'वुमन इन व्हाईट'ची वाट बघितली होती. टेकड्या त्या दफनभूमीला मायेने आपल्या कवेत घेत होत्या आणि थंड खळखळत्या पाण्याचा झराही तिथूनच बाजूने दगडी फरशीवरून वळसा घालून त्यांना आपली साथ देत होता. तिथे तो संगमरवराचा क्रॉस होता. छानसा आणि सुंदरसा. स्मारकाच्या शिरोभागी उभा पहारा देत. याच कबरीमध्ये त्या श्रांत मायलेकी विसावल्या होत्या. चिरनिद्रा घेत. कायमच्या !
०००

५.रिबेका - ₹५००/-
(मूळ किंमत ₹७३०/- ,अनुवादित रहस्य कादंबरी,पाने ३५१)
मूळ लेखिका : डॅफनी ड्यू मॉरिए
अनुवाद - आनंद ठाकूर

वाटेतला रस्ता कधी पूर्वेकडे तर कधी पश्चिमेकडे वळत होता. मध्ये तर त्याचं अस्तित्त्वच नाहीसं होत होतं. त्या अनिर्बंध वाढलेल्या जंगलातून अचानक भुतासारखं मला हवेलीचं दर्शन झालं. मॅण्डरली, आमची मॅण्डरली. नेहमीप्रमाणे अनेक गुपितांना कवेत घेत निस्तब्धपणे उभी असलेली आमची मॅण्डरली हवेली. शुभ्र चंद्रप्रकाशात माझ्या स्वप्नात चमकणारी करड्या रंगाची दगडी हवेली. खिडक्यांचे अनेक भाग करणारे उंच खांब. पलिकडे हिरवीगार हिरवळ. उघडी गच्ची. तळहातात हिऱ्यासारखी पकडून ठेवावी तशी ती मौल्यवान हवेली.
मार्ग आता आणखीनच आक्रसला होता. अधून मधूनच तो दिसत होता. आता तो न ओळखता येणारा बनला होता. वाटेतील गवत चिखलानं माखलं होतं. झाडांना आता खालीच फांद्या फुटल्या होत्या. हडळीची बोटं असल्यासारखी त्यांची वेडीवाकडी मुळं एकमेकांत घुसली होती. पुढे जायला धड वाट उरली नव्हती. अनेक अज्ञात वेली बांडगुळांप्रमाणेच हाडांचे सापळे असल्यासारख्या वृक्षांना वेटोळी घालून होत्या. ते दृष्य पाहूनच मनाचा थरकाप होत होता.
०००

६.कलंक आणि इतर कथा -₹४०५/-
(मूळ किंमत -५८०/- ,अनुवादित कथासंग्रह,पाने २८०)
मूळ लेखक -मुन्शी प्रेमचंद
अनुवाद -उज्ज्वला केळकर

हिंदी साहित्यातील श्रेष्ठ लेखक म्हणून 'मुन्शी प्रेमचंद' ओळखले जातात. त्यांच्या अत्यंत प्रसिद्ध अशा सुंदर कथांचा समावेश या कथासंग्रहामध्ये केलेला आहे. प्रेमचंदांच्या या कथा अत्यंत हलक्याफुलक्या, मनोरंजक आणि त्याबरोबरच वाचकाला अंतर्मुख करणाऱ्या आहेत. या पुस्तकातील बऱ्याचशा कथा ग्रामीण वातावरणाशी संबंधित आहेत. गावातील व्यक्ती, त्यांच्या स्वभावाचे विविध पैलू. त्यांच्या दैनंदिन जीवनात येणाऱ्या विविध समस्या, प्रत्येकाच्या व्यक्तित्त्वानुसार त्या समस्यांना तोंड देण्याची त्यांची पद्धत..... अशा सर्व बारीकसारीक बाबींचे या कथांमध्ये अत्यंत सुंदर चित्रण केलेले आहे.
०००

📨पोस्टेज वेगळे.

📞संपर्क क्रमांक :-
Book Roof Online Book Store:-
+91 87998 21809, पुणे .

⚠️महत्वाची सूचना :-
(हा बुक रूफ चा एकमेव व्हॉट्स ॲप आणि संपर्क नंबर आहे. पुस्तके हवी असल्यास तसेच अधिक माहितीसाठी यावर मेसेज किंवा थेट संपर्क करावा. कमेंट मध्ये कोणीही मोबाईल नंबर देऊ नयेत, कृपया सर्वांनी ही काळजी घ्यावी ही विनंती. धन्यवाद)
०००

🔸चित्रपट विषयक दुर्मिळ ,नवीन पुस्तके उपलब्ध !१.बालगंधर्व- व्यक्ती आणि कला  - वसन्त शान्ताराम देसाई( अत्यंत दुर्मीळ पुस्त...
06/03/2026

🔸चित्रपट विषयक दुर्मिळ ,नवीन पुस्तके उपलब्ध !

१.बालगंधर्व- व्यक्ती आणि कला - वसन्त शान्ताराम देसाई
( अत्यंत दुर्मीळ पुस्तक, हार्डबाऊन्ड प्रत, दुर्मीळ छायाचित्रे, ३४२ पाने)
बालगंधर्वांचे चरित्र. बालगंधर्व यांचे निधन झाल्यावर या पुस्तकाची द्वितिय आवृत्ती आली. त्यामुळे बालगंधर्व हयात असताना पहिल्या आवृत्तीचा जो भाग होता, त्यात अजून मजकूर वाढला आणि त्यांच्या निधनापर्यंतचे चरित्र यात आले आहे. तसेच बालगंधर्वांची दुर्मीळ छायाचित्रे आणि काही महत्त्वाची पत्रे देखील या आवृत्तीत आहे. अत्यंत सुबक कापड बांधणीत ( हार्ड बाऊंड) ही प्रत आहे. स्थिती एकदम चांगली आहे.
०००

२.दिग्दर्शक राज कपूर- भाई भगत: (दुर्मीळ पुस्तक,दुर्मीळ छायाचित्रे) , प्रकार- चरित्र, सिनेविषयक, व्यक्तीदर्शन, संगीतविषयक, आठवणी, किस्से)
०००

३.असे सूर ! अशी माणसं !- अरविंद गजेंद्रगडकर : ₹. १२५/- ( नवेकोरे पुस्तक, मूळ किंमत- ₹. १४०/-, प्रकार- व्यक्तिचित्रे, संगीतविषयक, साहित्यविषयक, व्यक्तिदर्शन, आठवणी, किस्से )

( संगीतावरच्या लेखांचे माझे हे तिसरे पुस्तक ! यातले सारे लेख 'अंतर्नाद' मासिकात प्रसिद्ध झालेले आहेत. 'स्वरधवल धारवाडचे सुरेल दिवस' या 'अंतर्नाद'च्या दिवाळी अंकातील लेखाला त्या वर्षीच्या सर्वोत्कृष्ट ललित लेखाचे म. सा. प. चे पारितोषिकही मिळाले. फक्त किशोरी आमोणकर, हरिप्रसादजी यांच्यावरचे लेख आणि 'तालरंगी रंगले मन' या लेखातला काही भाग खास या संग्रहासाठीच लिहिलेला आहे. उन्मेष प्रकाशनाच्या सौ. मेधा राजहंस यांच्यासारख्या उत्साही प्रकाशिकेने आपणहून या पुस्तकाच्या प्रकाशनाच्या बाबतीत पुढाकार घेतला हे माझे, आणखीन एक भाग्य ! कन्येप्रमाणे असलेल्या मेधा राजहंस यांचे मी आभार तरी कसे मानणार ? त्यांना ते आवडणार नाही. त्यांना मनःपूर्वक आशीर्वाद देतो. माझी या क्षेत्रातली वाटचाल पहात मला मनःपूर्वक वेळोवेळी दाद देणारे माझे स्नेही व प्रसिद्ध लेखक कविवर्य गंगाधर महांबरे यांनी चार शब्द लिहून माझ्या लेखनाला दाद दिली याबद्दल मी त्यांचा कृतज्ञ आहे.
प्रसिद्ध चित्रकार बाळ ठाकूर यांनी विषयानुरूप मुखपृष्ठ सिद्ध केले त्याबद्दल त्यांचे आभार ! )
०००

४.मूड आणि मस्ती - अजितेम जोशी: ₹.३७५/- ( आऊट ऑफ प्रिन्ट पुस्तक, मूळ किंमत- ₹. ४७०/-, प्रकार- मुलाखती, गप्पा, व्यक्तिदर्शन, व्यक्तिचित्रे, आठवणी, किस्से, सिनेविषयक, नाट्यविषयक, साहित्यविषयक )

( 'मूड आणि मस्ती' या नव्या पुस्तकाच्या माध्यमातून आपल्यासोबत संवाद साधताना विशेष आनंद होतो आहे...
साधारण तीच-चार दशकांपूर्वी म्हणजे ऐशी-नव्वदच्या दशाकामध्ये नाट्य-चित्रपट-मालिका क्षेत्रात घडलेल्या काही महत्वाच्या घटनांचा वेध, काही मुलाखती, लेख यांच्या सहाय्याने घेण्यात आला. त्याचा एक गोफ गुंफून पुस्तक रूपाने आज आपल्यासमोर सादर होत आहे.
* सुप्रसिद्ध अभिनेत्री रोहिणी हट्टगंडी यांचा गांधी या आंतरराष्ट्रीय चित्रपट करतानाचा अनुभव.
* सिद्धहस्त लेखिका, अभिनेत्री प्रिया तेंडुलकर यांनी रेखाटलेले विजय तेंडुलकर यांचे चित्रण.
* ५००० हून अधिक जाहिराती करणाऱ्या दिग्दर्शक गिरीश घाणेकरांचा थक्क करणारा प्रवास.
* पाचवा नटसम्राट यशवंत दत्त यांचे विवेचन.
* ख्यातनाम लेखक-नाटककार विजय तेंडुलकर यांचा अभिनयक्षेत्रातील प्रवेश.
* सुधाताई करमरकर व बालरंगभूमीचा प्रवास.
* आता १२५०० प्रयोगांयचा विक्रम करणाऱ्या पण त्याकाळी ३४४३ प्रयोगांचा रेकॉर्ड करणाऱ्या सुपरस्टार प्रशांत दामलेची केलेली दणक्यात मुलाखत.
* निळू फुले, दिलीप प्रभावळकर, राजा मयेकर, प्रमिला दातार, गंगाराम गवाणकर, अश्विनी भावे, विजय मोंडकर, कमलाकर सारंग, लिलाधर कांबळी, माझा जीवलग मित्र इर्शाद हाश्मी, राजन वाघधरे, विजय साळवी, सुनिल शेंडे, गोट्या सावंत, शशिकांत शिर्सेकर अशा अनेक मान्यवरांशी केलेली बातचित.
त्यावेळी नवोदित पण आज नामांकित मान्यवर म्हणून गणल्या - गाजल्या जाणाऱ्या गिरीष ओक, निवेदिता जोशी-सराफ, सविता प्रभूणे, सुकन्या कुलकर्णी-मोने, जनार्दन लवंगारे यांच्याशी केलेल्या गप्पागोष्टी. एवढी मोठी कर्तृत्ववान माणसं मला भेटली याबद्दल खरंच मी स्वत:ला खूप भाग्यवान समजतो...
चार दशकांपूर्वीच्या घटनांकडे आज मागे वळून बघताना अतिशय वेगळा अनुभव वाचकांना येईल असा विश्वास वाटतो. काहींना याचा संदर्भासाठी उपयोगही होऊ शकेल असं वाटतं. )
०००

५.रूपेरी आठवणी- इसाक मुजावर: ( दुर्मीळ पुस्तक, प्रकार- सदर लेखन, व्यक्तिचित्रे, ललितलेख, व्यक्तिदर्शन, सिनेविषयक, अभिनेता, गायक, गायिका, नाट्यविषयक, आठवणी, किस्से )

( दिलीप प्रकाशनतर्फे प्रकाशित होणारे 'रुपेरी आठवण' हे माझं तिसरं पुस्तक म्हणजे 'सामना'तील माझ्या 'आठवण' या स्तंभातील लेखांचेच संकलन आहे. या पुस्तकातील भांडण मिटवणारी कोंबडी, रुपेरी शिवाजी कायमचा वादग्रस्त, अस्थी, मुस्लिमांचं दिवाळी गीत हे चार लेख 'लोकमत' मधील आहेत. व 'सुरैयाचं श्रीमंत मरण' हा एक लेख 'लोकसत्ता'तील. बाकी सारे लेख 'सामना'च्या ‘आठवण’ स्तंभातील. 'आठवण' हा स्तंभ मी सुरू केला तेव्हा श्रीकांत ठाकरे आपल्यात होते. पण हा स्तंभ चालू असतानाच ते आपल्यातून गेले १० डिसेंबर २००३ला. सुरैयाही तेव्हा आपल्यात होती. पण ती आपल्यातून गेली ३१ जानेवारी २००४ला. ती गेली तेव्हा मी तिच्या एका शेजाऱ्याला भेटायला गेलो होतो. आणि तेथे जवळच राहत असलेल्या महीपालला भेटायला त्याच्या घरी गेलो होतो. महीपाल माझ्याशी गप्पा मारत असताना स्वतः विषयी माझ्याशी बरंच बोलला होता. आणि निरूपा रॉयविषयीही. पण आता महीपालही आपल्यात राहिलेला नाही. निरूपा रॉयही आपल्यात राहिलेली नाही. त्यांच्या आठवणी मात्र मागे उरल्या आहेत.
'रुपेरी आठवण' हे माझं पुस्तक म्हणजे मागे उरलेल्या आठवणींना उजाळा देण्याचा एक प्रयत्न आहे. 'स्क्रीन प्ले' व 'सिनेमाचा सिनेमा' या माझ्या पुस्तकांना वाचकांनी भरभरून दाद दिली. 'स्क्रीन प्ले' या माझ्या पुस्तकाचं कौतुक करणारं एक पत्र कॅनडाहून डॉ. विजय ढवळे यांनी मला पाठवलं. माझ्या 'रुपेरी आठवणी'लाही वाचकांकडून हीच दाद मिळेल अशी मला अपेक्षा आहे.- इसाक मुजावर )
०००

६.सिनेरंग- इसाक मुजावर : (आऊट ऑफ प्रिन्ट पुस्तक, प्रकार- सिनेविषयक, किस्से, आठवणी, संगीत जगत, व्यक्तिदर्शन)

( इसाक मुजावर म्हणजे हिंदी चित्रपटांचा चालता-बोलता कोश. आठवणींची रम्य मालिका उलगडत मुजावर यांचे लेखन वाचकांना आपल्याबरोबर घेते. सिनेरंग हे पुस्तक याच पठडीतील आहे. छोटे-मोठे तब्बल २८ लेख या पुस्तकात आहेत.
मुजावर यांना लेखनासाठी विषयाची कमी पडत नाही. वरवर पाहता बिन महत्त्वाचे वाटणारे विषय त्यांच्यामधून निवडले जातात आणि याच विषयांवर लिहिताना ते अतिशय महत्त्वाची माहिती सहजतेने देऊन जातात. सिनेरंग वाचताना वाचकांना तोच अनुभव घेता येईल, वाचनीयतेबरोबर माहितीत भर पडल्याचा प्रत्यय त्यांना येईल.)
०००

७.नूरजहॉं ते लता- इसाक मुजावर: ( दुर्मीळ पुस्तक ( दुर्मीळ छायाचित्रांसह) , प्रकार- सिनेविषयक, संगीतविषयक, व्यक्तीदर्शन, आठवणी, किस्से, सिनेइतिहास)

( सुरांच्या चाहत्यांना... मर्मबंधातील आठवणींची एक सुरीली भेट.मलिका-ए-तरन्नुम नूरजहाँ व गानकोकिळा लता मंगेशकर त्यांच्या भारतीय चित्रपट संगीताच्या सुवर्णयुगाचा अत्यंत रोचक इतिहास.एक हृदयस्पर्शी व आवर्जून वाचावे असे मार्मिक लेखन.)
०००

८.सिनेमाचे तीन साक्षीदार -इसाक मुजावर
(दुर्मिळ पुस्तक,प्रकार -व्यक्तिचित्रण, सिनेमाविषयक,मुलाखती)

कोणताही कलावंत चित्रपटात येतो तेव्हा तो एक नवोदित कलावंत असतो. पण काही वर्षे लोटल्यावर मात्र तो येथे एक नवोदित कलावंत राहत नाही. चित्रपटव्यवसायातील एका फार मोठ्या वाटचालीचा तो साक्षीदार बनतो. स्वत:च्या रुपेरी जीवनावर बोलत असताना रुपेरी जीवनाच्या आपल्या वाटचालीत त्याने पाहिलेला काल व या कालात त्याला भेटलेली माणसे यावरही तो बोलत असतो आणि त्याच्या या बोलण्यातून चित्रपटव्यवसायाच्या एका काळाचा इतिहास आपल्यासमोर उलगडत जातो.
सिनेमाचे तीन साक्षीदार' हे माझे नवे पुस्तक म्हणजे काळाचा इतिहास उलगडण्याचाच माझा एक प्रयत्न आहे. या पुस्तकातील सिनेमाचे तीन साक्षीदार आहेत : राजेन्द्र कृष्ण, कविता / गांधारी राणे व जयराज. यापैकी राजेन्द्र कृष्ण म्हणजे ५०-६० च्या दशकात हिंदी चित्रपटात आपले एक युग निर्माण करणारे लेखक व गीतकार. कविता व गांधारी या राणेभगिनी कोरसमधील गायिका आणि ज्येष्ठ अभिनेते जयराज .
०००

९.पेज थ्री फ्लिमी फंडाज -इसाक मुजावर
(दुर्मीळ पुस्तक, प्रकार- सदर लेखन, व्यक्तिचित्रे, ललितलेख, व्यक्तिदर्शन, सिनेविषयक, अभिनेता, गायक, गायिका, नाट्यविषयक, आठवणी, किस्से)

'स्क्रीन प्ले', 'सिनेमाचा सिनेमा', 'रुपेरी आठवणी', 'सिनेरंग' व 'लकीअनलकी' या पाच पुस्तकांनंतर दिलीप प्रकाशनतर्फे प्रकाशित होणारे हे माझे सहावे पुस्तक, 'पेज थ्री- फिल्मी फंडाज.' हे पुस्तक म्हणजे 'महाराष्ट्र टाइम्स'च्या मुंबई टाइम्स या पुरवणीत प्रसिद्ध होणाऱ्या माझ्या 'फिल्मी फंडाज' या स्तंभातील लेखांचं संकलन आहे. तरीही या पुस्तकाला मी 'फिल्मी फंडाज' हे नाव दिलेले नाही. 'पेज थ्री- फिल्मी फंडाज' असे नाव दिलेय. कारण फिल्मी फंडाज हा स्तंभ लिहिण्याची प्रेरणा मला दिली ती 'पेज थ्री' या चित्रपटाने.
०००

१०.फिल्लमगिरी- द्वारकानाथ संझगिरी-
(दुर्मिळ पुस्तक,प्रकार -व्यक्तिचित्रण, सिनेमाविषयक)

हिंदी चित्रपट हा सर्व भारतियांच्या प्रेमाचा विषय. त्यातले नाटनट्या, त्यांची लफडी यात सगळ्यांना प्रचंड रस असतो. यातल्या प्रत्येक विषयावर प्रत्येकाची स्वतंत्र, पण ठाम अशी मतं असतात. त्यातूनच दिलीपकुमार अमिताभसारखी श्रद्धास्थानं आणि किशनकुमार-सुनील शेट्टीसारखी टिंगलस्थळं निर्माण होतात. लतावर उगाचच डूख धरलेले आशाचे चाहते आणि आशावर खुन्नस ठेवणारे लताचे भक्त निपजतात.
या विषयावर अधिकारवाणीने बोलायला काही प्रचंड अभ्यासाची अथवा व्यासंगाची गरज नसते. चित्रपटाच्या दुनियेने प्रत्येकाच्याच आयुष्यात काही सोंनेरी क्षण पेरलेले असतात. त्या क्षणांच्या आठवणी चित्रपटाच्या बेगडी दुनियेवर प्रेम करायला शिकवतात. म्हणूनच या विषयावरची मतं ठाम व्हायला मेंदूपेक्षा हृदयाचीच मदत जास्त होते. त्यात आजकाल रेडियोतून, दूरदर्शनवरून, देशी-विदेशी वाहिन्यांमधून, वृत्तपत्रांमधून अगदी गणेशोत्सवाच्या कर्ण्यामधूनसुद्धा चित्रपट सदैव डाळ्यावर, कानावर आणि मनावर आदळत असतो.
कुठल्याही गप्पांच्या मैफिलीत रंग भरायला असे फिल्मी विषय खूप उपयोगी पडतात. पण मैफील रंगतदार करायला गप्पा रंगवण्याची शैली मात्र पाहिजे. अशाच एका फिल्लमबाजांच्या मैफिलीचं हे शब्दरूप.
०००

📨पोस्टेज वेगळे.

📞संपर्क क्रमांक :-
Book Roof Online Book Store:-
+91 87998 21809, पुणे .

⚠️महत्वाची सूचना :-
(हा बुक रूफ चा एकमेव व्हॉट्स ॲप आणि संपर्क नंबर आहे. पुस्तके हवी असल्यास तसेच अधिक माहितीसाठी यावर मेसेज किंवा थेट संपर्क करावा. कमेंट मध्ये कोणीही मोबाईल नंबर देऊ नयेत, कृपया सर्वांनी ही काळजी घ्यावी ही विनंती. धन्यवाद)

★ चित्रमय स्वगत (डिलक्स)- पु. ल. देशपांडे ( कापडी पुठ्ठा बांधणी )हे पुस्तक म्हणजे पुलंनी स्वत:ची जीवनकथा छायाचित्रे आणि ...
04/03/2026

★ चित्रमय स्वगत (डिलक्स)- पु. ल. देशपांडे ( कापडी पुठ्ठा बांधणी )

हे पुस्तक म्हणजे पुलंनी स्वत:ची जीवनकथा छायाचित्रे आणि चित्रांच्या माध्यमातून सांगितलेले निवेदन आहे. त्यात त्यांच्या घरच्या माणसांबरोबरच त्यांचे सोबती, त्यांच्या राहत्या जागेच्या आठवणी, पुस्तके, चित्रपट, नाटकं आणि इतरही गोष्टींचे दर्शन घडते.

ही आवृत्ती महत्त्वाचे ठरण्याचे कारण म्हणजे ती पहिली आवृत्ती आहे. पु.ल. हयात असताना तिचे प्रकाशन झाले. त्या पुस्तकाच्या मर्यादित प्रती प्रकाशित केल्या होत्या. ज्यातील काही प्रती स्वत: पुलंनी साक्षांकित केल्या होत्या. ही त्या आवृत्तीतील ८३५ वी प्रत.

हा मराठी मातीतला अत्यंत सुबक आणि देखणा ठेवा आहे.
हे पुस्तक पुलंची स्वाक्षरी असल्यामुळे दुर्मीळ आहे. बाहेर इतर ठिकाणी विक्रेत्यांकडे हे पुस्तक ऑक्शन अथवा इतर स्वरूपात पाच आकडी स्वरूपात देखील विकले गेले आहे. त्यामुळे याची किंमत त्या मानाने खूपच रास्त दरात असेल, याची कृपया नोंद घ्यावी. यात छायाचित्रांसोबतच वसंत सरवटे यांचे आसपासवरील ( End Papers) चित्रे देखील लक्षवेधी स्वरूपात आहे.

याचे प्रथम बुकिंग करणार्‍यास प्राधान्य दिले जाईल, याची कृपया नोंद घ्यावी. आणि हा दुर्मीळ ठेवा आपल्या सोबत कायमस्वरूपी जतन करून ठेवावा, असाच आहे.
०००

📨पोस्टेज वेगळे.

📞संपर्क क्रमांक :-
Book Roof Online Book Store:-
+91 87998 21809, पुणे .

⚠️महत्वाची सूचना :-
(हा बुक रूफ चा एकमेव व्हॉट्स ॲप आणि संपर्क नंबर आहे. पुस्तके हवी असल्यास तसेच अधिक माहितीसाठी यावर मेसेज किंवा थेट संपर्क करावा. कमेंट मध्ये कोणीही मोबाईल नंबर देऊ नयेत, कृपया सर्वांनी ही काळजी घ्यावी ही विनंती. धन्यवाद)

🔸द.पा.खांबेटे यांची नवीन ,दुर्मिळ पुस्तके उपलब्ध! १.साहसी स्त्री गुप्तहेर -द.पा. खांबेटे -₹२००/-(नवीन पुस्तक,कथासंग्रह,म...
27/02/2026

🔸द.पा.खांबेटे यांची नवीन ,दुर्मिळ पुस्तके उपलब्ध!

१.साहसी स्त्री गुप्तहेर -द.पा. खांबेटे -₹२००/-
(नवीन पुस्तक,कथासंग्रह,मूळ किंमत -₹२५०/-)

आज जीवनाच्या सर्व क्षेत्रांत स्त्रिया आघाडीवर आहेत. 'हेरगिरी'चे क्षेत्रहीत्याला अपवाद नाही ! पहिल्या आणि दुसऱ्या महायुद्धांतजर्मन आणि ब्रिटिश हेरस्त्रियांनी गाजवलेल्या शौर्याच्या या कथावाचकांना त्या नक्कीच आवडतील!

गुप्तहेरांवरचे चित्रपट जगभर लोकप्रिय झालेले आहेत. जेम्स बाँडचे सगळे नाहीत तरी एखादातरी चित्रपट तुम्ही पाहिला असेल. चित्रपटातला गुप्तहेर अनेक रोमहर्षक साहसे करतो, प्राणान्तिक संकटांशी झुंज देतो आणि अखेर आपल्या कामगिरीत पुरेपूर यशस्वी होतो. मध्यंतरात अनेक सौंदर्यवती तरुणींशी त्याचा संबंध येतो आणि तो मजा करतो. गुप्तहेराचे जीवन साहसप्रचुर असले तरी मोठे रोमँटिक असते असा प्रेक्षकांच्या मनावर ठसा उमटतो.
प्रत्यक्ष परिस्थिती मात्र अगदी वेगळीच असते.
गेल्या महायुद्धाच्या काळात 'नोरा बेकर' नावाची एक रूपसुंदर तरुणी ब्रिटनची गुप्तहस्तक म्हणून फ्रान्समध्ये गुपचूप गेली होती. तिचे सांकेतिक नाव होते 'मॅडेलाइन' नि खरे नाव होते नूरुन्निसा इनायत खान. टिपू सुलतानाच्या वंशातली ही मुलगी इंग्लंडमध्ये स्थायिक झाली होती. ती हेरगिरीच्या कामगिरीवर फ्रान्समध्ये गेली होती आणि फ्रेंच तरुणी म्हणून वावरत होती. पूर्वी एकदा फ्रान्समध्ये ती काही वर्षे राहिली होती आणि तिला फ्रेंच भाषा अवगत होती, म्हणून तिची या कामावर निवड झाली होती. जर्मनव्याप्त फ्रान्समध्ये ब्रिटिशांची हेर म्हणून काम करणे अत्यंत धोक्याचे होते; पण तिने साहसीवृत्तीने नि हुकूमशाहीविरोधी ध्येयवादाने ने काम पत्करले होते. मादाम बालाशोस्की नावाच्या एका स्त्रीला नूरुन्निसाचे खरे काम माहीत होते, कारण तीही तिच्या गटात जर्मनविरोधी काम करणारी होती. एकदा मादाम बालाशोस्की हिच्या घरी ती गेलेली असताना, तिथे इतर काही फ्रेंच स्त्रिया सहज भेटायला म्हणून आलेल्या होत्या. सर्वांसाठी चहा करण्यात आला. आपणही मदत करावी म्हणून नूरुन्निसा स्वयंपाकघरात गेली आणि कपबशांचा ट्रे घेऊन आली. तिनं कपात दूध घातले आणि नंतर किटली घेऊन प्रत्येक कपात चहा ओतला.
एक पाहुणी हे पाहत होती. ती मादाम बालाशोस्कीकडे वळून म्हणाली, 'ही तरुणी इंग्रज दिसते !'
मादाम बालाशोस्की काही बोलली नाही. तिने ते न ऐकल्यासारखे दाखवले आणि दुसराच विषय काढला. ती पाहुणीही ते विसरून गेली. आलेल्या सगळ्या स्त्रिया निघून गेल्यावर मादाम बालाशोस्की हिने नूरुन्निसाला बाजूला नेऊन गंभीर स्वरात म्हटले, 'तुला साध्या-साध्या गोष्टीतही फार काळजी घ्यायला पाहिजे गं बाई!'
'का? काय झालं?' नूरुन्निसाने विचारले.
‘आत्ता आलेल्या पाहुण्या सामान्य गृहिणी आहेत आणि त्या हिटलरच्या कट्टर शत्रू आहेत म्हणून ठीक! पण त्यांच्यामध्ये जर का हिटलरधार्जिणी एखादी स्त्री असती तर तू फ्रेंच नसून ब्रिटिश आहेस, हे तिनं तत्काळ पोलिसांना कळवलं असतं!'
'म्हणजे ? माझ्या हातून काय चुकलं?'
'तू चहा देताना कपात प्रथम दूध घातलंस नि मग वर चहा ओतलास!
०००

२.अफलातून हेरगिरी आणि इतर कथा : द.पां. खांबेटे - ₹२५५/- (नवीन पुस्तक, मूळ किंमत ₹ ३२०/- )

द. पां. खांबेटे हे एक वाचकप्रिय लेखक. विविध विषयांवर त्यांनी विपुल लेखन केलं.त्यांच्या हेरकथा, युद्धकथा, साहसकथा आजही वाचकांना खिळवून ठेवतील.
अंगावर काटा आणणाऱ्या या थरारक कथा एकदा वाचायला सुरुवात केली की पुस्तक वाचून पूर्ण झाल्याशिवाय
वाचक थांबूच शकत नाही.
हेच 'खांबेटे यांच्या लेखणीचं यश आहे.
०००

३.भयकथा -द.पा. खांबेटे :- ₹२००/-
(नवीन पुस्तक, मूळ किंमत - ₹२४० /-,प्रकार -रहस्य/विस्मय/गूढ/भयकथा )

खांबेटे यांच्या भयकथांचे एक ठळक वैशिष्ट्य असे की केवळ भयकथा किंवा रहस्यकथा म्हणून त्यांची सरधोपट विल्हेवाट आपण लावू शकत नाही. कधी त्या कथांना विज्ञानाची जोड असते, कधी त्या आध्यात्मिक अनुभवांच्या अंगाने जातात, कधी त्यांना मानवी मनातल्या गूढ आणि अगम्य हालचालींची पार्श्वभूमी लाभते तर कधी निखळ विनोदाचा भयंकर अनुभूतीशी मजेदार गुणाकार होतो आणि भयविस्मयातून हास्यनिर्मिती होते. या संग्रहातील काही कथा कोकणच्या पार्श्वभूमीवर आकाराला येतात.त्यामुळे तिथली भुतेखेते, समंध, खवीस, देवचार, मुंजे यांना त्या कथांत महत्त्वाचे स्थान लाभते. तिथला कधी सुंदर तर कधी भीषण असा निसर्गही कथेतल्या भीतीच्या छटा गडद करतो; पण हे सर्व असूनही या कथा मनात अंधश्रद्धा जागवत नाहीत किंवा तर्कविसंगत चमत्कारावरही भर देत नाहीत. त्यांचे म्हणून एक तर्कसंगत वास्तव या कथांत आहे..
या संग्रहामधील कथांचे एकूण स्वरूप हे असे आहे. त्या सर्वप्रथम भयकथा आहेत; आणि कथा म्हणूनही त्या उत्कृष्ट आहेत. खांबेटे यांचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे त्यांचे संवाद. ते अतिशय जिवंत, प्रत्ययकारी आणि प्रसंगानुरूप त्या त्या भाववृत्तीचे यथार्थ चित्रण करणारे असे आहेत. सुरुवातीला म्हटल्याप्रमाणे खांबेटे हे मराठीतल्या भयकथांचे आद्य प्रवर्तक आहेत. या कथा खरे तर बऱ्याच वर्षांपूर्वी लिहिल्या गेलेल्या आहेत; पण आज पुनर्मुद्रित होताना त्या जेव्हा परत वाचल्या, तेव्हा त्यांना जुनेपणाचा स्पर्शही झाल्यासारखा वाटला नाही. या कथांची भाषा आजही ताजी, टवटवीत, प्रसन्न आहे. या 'भीतीच्या छाया' आजच्या वाचकालाही आवडतील आणि भयकथांच्या संग्रहांत या संग्रहाने लक्षणीय भर पडेल याची मला खात्री वाटते.
शांता शेळके (प्रस्तावनेतून)
०००

४.अद्‌भुताच्या जगात- द. पां. खांबेटे:
( दुर्मीळ पुस्तक, प्रकार- गूढ-विस्मय-भयकथा संग्रह )

(प्रस्तुत पुस्तकात इंग्लंड, अमेरिका, मेक्सिको, हॉलंड, युगोस्लाव्हिया, जर्मनी, नॉर्वे, ग्रीस, कॅनडा इत्यादी दूरदूरच्या देशांतीलच हकीकती निवेदन केल्या आहेत. ज्यांना आपण निर्भेळ जटवादी नि जडवादी नि चिकित्सक बुद्धिवादी म्हणतो, त्या पाश्चिमात्य लोकांमध्ये अभौतिक घटनांचे निरीक्षण, परीक्षण आणि संशोधन आता अधिकाधिक प्रमाणात होऊ लागले आहे. जे लोक स्वतःला बुद्धिवादी म्हणवतात आणि आजच्या भौतिक विज्ञानाने ज्याचा उलगडा होऊ शकत नाही अशा घटना 'सब झूट' म्हणून मोकळे होतात, ते खरोखरी विज्ञाननिष्ठ नसून अज्ञाननिष्ठ म्हटले पाहिजेत. 'जे मला कळत नाही ते खोटे' इतकीच या तथाकथित बुद्धिवाद्यांची भाबडी नि ठाम समजूत असते. आता पाश्चिमात्य जगात, अगदी परिपूर्ण जडवादी कम्युनिस्ट रशियात देखील, असल्या अतिभौतिक नि विज्ञानाला अगम्य असलेल्या घटनांचा अभ्यास सुरू झाला आहे आणि या अभ्यासाला नि संशोधनाला रशियातही सरकारी पाठिंबा लाभला आहे. गोरा साहेब जेव्हा या क्षेत्राचा अभ्यास करून एखादे अतिभौतिक विज्ञान सांगू लागेल नि शिकवू लागेल, तेव्हा मात्र आपले बुद्धिवादी आदराने माना डोलावू लागतील. तो पर्यंत नाही.
प्रस्तुत पुस्तकात भुताखेतांपासून जारण- मारणापर्यंत आणि सात्त्विक सिद्धीपासून अघोरी सिद्धीपर्यंत अनेक प्रकारच्या प्रत्यक्ष घडलेल्या चित्तवेधक कथा सांगितल्या आहेत. वाचकांना या कथा आवडतील आणि विचार करायलाही लावतील असा माझा विश्वास आहे.- द. पां. खांबेटे, प्रस्तावने मधून )
०००

📨पोस्टेज वेगळे.

📞संपर्क क्रमांक :-
Book Roof Online Book Store:-
+91 87998 21809, पुणे .

⚠️महत्वाची सूचना :-
(हा बुक रूफ चा एकमेव व्हॉट्स ॲप आणि संपर्क नंबर आहे. पुस्तके हवी असल्यास तसेच अधिक माहितीसाठी यावर मेसेज किंवा थेट संपर्क करावा. कमेंट मध्ये कोणीही मोबाईल नंबर देऊ नयेत, कृपया सर्वांनी ही काळजी घ्यावी ही विनंती. धन्यवाद)

🔸दुर्मिळ पुस्तके उपलब्ध!!१)प्रियजन- गिरिजा ओक:   ( दुर्मीळ पुस्तक,  प्रकार- व्यक्तिदर्शन, व्यक्तिचित्रे, व्यक्तिदर्शन, स...
20/02/2026

🔸दुर्मिळ पुस्तके उपलब्ध!!

१)प्रियजन- गिरिजा ओक: ( दुर्मीळ पुस्तक, प्रकार- व्यक्तिदर्शन, व्यक्तिचित्रे, व्यक्तिदर्शन, साहित्यविषयक, आठवणी, किस्से )

( 'ही सर्व व्यक्तिमत्वं सत् च्या विचारानं भारलेली आहेत. हाती घेतलेलं काम निष्ठेनं करणारी आहेत. आजच्या भ्रष्टाचारी जगात, पैशामागे पिसाटासारखे धावणारे लोक आपण पाहातो. पैसा हाच परमेश्वर मानणाऱ्या अशा मंडळींना कसलाच विधिनिषेध नसतो. अशावेळी तरुण पिढीपुढं काही जीवनमूल्यं ठेवणं हे आपलं कर्तव्य आहे असं मी समजते. कृतीतून, उक्तीतून आणि लेखणीच्या माध्यमातून हे शक्य आहे. व्यक्तिस्वातंत्र्य, मतस्वातंत्र्य यांची मी स्वतःही पुरस्कर्ती आहे. तरीदेखील आपल्या आचार-विचारांमागे विवेकाची एक शहाणी चौकट असायला हवी यावर माझी श्रद्धा आहे. म्हणूनच ज्या ज्या मार्गानं काही चांगलं रुजवता येईल ते रुजवण्याची माझी धडपड असते. जीवननिष्ठा जपणाऱ्या गिरिजा कीर यांच्या या पुस्तकातून त्यांच्या वरील उद्गारांचं प्रत्यंतर वाचकांना येईल'. )
०००

२)गुलमोहराची पाने -माधव गडकरी (दुर्मिळ पुस्तक, प्रकार -लेखसंग्रह, साहित्य,कला, समाजदर्शन राजकारण)

ऐक्य' या साताऱ्याहून प्रसिद्ध होणाऱ्या वृत्तपत्राचा ७६ वा वाढदिवस दि. १९ जानेवारी १९९९ रोजी साजरा झाला. त्यानंतर अल्पावधितच 'गुलमोहराची पाने' हा माझा लेखसंग्रह प्रसिद्ध होत आहे, याचा मला आनंद वाटतो.
फेब्रुवारी १९९७ मध्ये 'चौफेर' हे सदर लिहिणे मी बंद केले. आमच्याकडे लिहा, अशी मागणी मुंबई शहराबाहेरच्या वृत्तपत्रांची अधिक होती. त्यात 'ऐक्य' चे श्री. पळणिटकर बंधू हे प्रमुख होते. श्री. शरद पळणिटकर घरीच आले. आणि त्यांनी ‘रोज लिहा' असा मंत्र दिला. रविवार सोडून रोज लिहावयाचे तसे अवघड होते. कारण माझे इतर लेखन चालूच असते. दि. ११ ऑक्टोबर १९९७ या दसऱ्याच्या शुभमुहूर्तावर मी लेखन सुरू केले. आणि ते आजतागायत अखंड चालू आहे. 'चौफेर'चाच हा नवा आविष्कार आहे. विषय आणि भाषा यात थोडा फरक केला आहे.
जिल्हापत्रे वाढली पाहिजेत ही माझी सुरुवातीपासूनची भूमिका. कारण मीही अगदी सुरूवातीस एका जिल्हापत्राचाच संपादक होतो. मुंबईची वृत्तपत्रे चाळली जातात आणि जिल्हापत्रे वाचली जातात. मुंबईच्या वृत्तपत्राशी तोडीस तोड 'ऐक्य' दैनिकाचे आज स्वरूप झाले आहे. त्यामुळे तेथे लिहिताना आनंद वाटतो.
'गुलमोहरा' चे झाड हे माझ्या आयुष्यात मित्रासारखे वावरले. त्याच्या साथीनेच सर्व लेखन झाले. गुलमोहराचे निरीक्षण करीत बसावे आणि दुसऱ्या दिवशी वसंताचे आगमन होताच त्या पानांची फुले झालेली दिसावीत असे अनेकदा घडले. ती स्मृती कायम राहावी म्हणून सदराला तसे नाव दिले.
त्या पानांवरच लिहिलेले हे लेख. शब्दांची फुले व्हावीत या अपेक्षेने लिहिलेली. मग विषय अनंत. साहित्य, कला, शिक्षण, समाजदर्शन, आणि रोज ढवळून निघणारे राजकारण. त्यावरील ही टीका टिपणी. विचारांना चालना देणारी !
माधव गडकरी...

३)आठवण- गंगाधर गाडगीळ: ( आऊट ऑफ प्रिन्ट पुस्तक, प्रकार- नवकथा संग्रह )

( गंगाधर गाडगीळ हे मराठी लेखक, अर्थतज्ज्ञ व साहित्यसमीक्षक होते. मराठी साहित्यात कथा या साहित्यप्रकारातील त्यांच्या योगदानामुळे त्यांना 'नवकथेचे अध्वर्यू' असे संबोधले जाते. त्यांनी नवकथेमध्ये नवनिर्मिती घडवून आणली.कथेचे नवे वळण विकसित करण्याचे श्रेय गंगाधर गाडगीळ यांचेकडे जाते. गाडगीळ आपल्या कथेतून वाचकांसमोर मनोरम चित्र रेखाटतात, एकरूप होतात. संज्ञा प्रवाही लेखन स्वप्नाचा प्रयोग लेखनात केला.
एखाद्या अनुभवाला, भाववृत्तीला अनेक अंगं असतात. आणि ती एकमेकांहून भिन्नच नव्हते, तर कित्येकदा परस्परविरुद्धही असू शकतात; या गोष्टींचे भान राखून विविध अंगांनी घेतलेला अनुभवाचा वेध गाडगीळांच्या कथेत आढळतो. असं बाह्यांगी दर्शन हे या कथेचं एक वेगळेपण ठरते, याचा प्रत्यय या संग्रहातील कथांमधून येतो.
या संग्रहात एकूण ८ कथा समाविष्ट आहेत. )
०००

४)काळोख- संजय सोनवणी: ( दुर्मीळ पुस्तक, प्रकार- कादंबरी )

( मानवी जीवनाचा प्रवाह हाच मुळी व्यामिश्र - गुंतागुंतीचा, यश अपयशाच्या भोवऱ्यांचा; पण त्यातूनही मनुष्य तगतो ते त्याच्या परिस्थितीवर मात करण्याच्या चिवट जाणिवेनेच !
'काळोख' ही केवळ एका परिवाराची कथा नाही तर...
समाजाच्या एका विशिष्ट कालखंडातील प्रवाहांची आणि त्यांचा मानवी जीवनावर पडणाऱ्या प्रभावाची मनोवैज्ञानिक गाथा आहे.
कल्पना, विद्याधर, सुधाकर, जया, बाबा आई व इतर अन्य पात्रे, या सामाजिक प्रवाहांची अपरिहार्य शिकार होतात.
पण त्यातूनही मनाला भिडते ती त्यांची परिस्थितीवर परंपरांवर मात करण्याची विलक्षण जिद्द!
त्या दृष्टीने ही कादंबरी लक्षणीय आहे ! )
०००

५)झोका ( संपादित कथासंग्रह): ( दुर्मीळ पुस्तक, प्रकार- विविध लेखक/ लेखिकेंचे कथा एकत्रित असलेले संपादन, कथासंग्रह, स्त्री मासिकातून निवडलेल्या उत्कृष्ट कथांचा संग्रह)

( कथा या वाङ्मयप्रकाराबद्दलचं प्रेम जितकं सनातन आहे, तितकंच नियतकालिकांशी, त्यातही मासिकांशी असणारं त्यांचं नातं सनातन आहे. 'स्त्री' मासिकात सुरुवातीला, जवळजवळ पंचेचाळीस सालापर्यंत दर अंकात सहा ते आठ इतक्या कथा आलेल्या आहेत. काळाच्या ओघात या संख्येचा संकोच झाला असला तरी दर्जाशी तडजोड सहसा झालेली नाही त्यातही दिवाळी अंक, विशेषांक उत्तम कथांची आवर्जून दखल घेत असतात त्यांची झलक दाखविण्यासाठी ठराविक कालखंडात 'स्त्री' मध्ये प्रसिद्ध झालेल्या निवडक कथांचे संग्रह प्रसिद्ध करावेत असे आम्ही योजिले आहे. प्रस्तुतचा संग्रह हा त्या उपक्रमातला पहिला भाग कालखंड १९७० ते १९७५ एवढ्या दीर्घ काळातल्या दीडदोनशे कथांमधून दहापंधरा कथा निवडताना एखादाच ठाशीव निकष लावणे कठीण पडते. एकीकडे त्या त्या काळातली त्या कथेची लोकप्रियता, त्या त्या लेखकाच्या इतर लेखनामध्ये तिचे असणारे स्थान, तिचा सांस्कृतिक सामाजिक संदर्भ लक्षात घ्यावा लागतो तर दुसरीकडे संग्रहातले विषयांचे वैविध्य, वाचकांचे रुचिवैचित्य यांचेही भान ठेवावे लागते. या सर्वच बाबतींत शक्य तितकी समतोल व प्रातिनिधिक दृष्टी ठेवून या संग्रहातील कथांची निवड केलेली आहे. प्रसिद्धीच्या कालक्रमानुसारच त्यांचा संग्रहातला क्रमही ठेवण्यात आलेला आहे. दरम्यानच्या काळात कथा या वाङ्मयप्रकारात खूपच बदल झाले. स्त्री जीवनाचा तोंडवळा बदलला, समस्यांचे संदर्भ बदलले. पण झोका जितका उंच जाईल तितकी मागच्याची ओढ व पुढच्याचे कुतूहल वाढायचेच वाचकांनाही असाच अनुभव आल्यास आम्हांला आनंद वाटेल. )
०००

६)अवकाश- जी. के. ऐनापुरे: (दुर्मीळ आवृत्ती (प्रथमावृत्ती,प्रकार-कादंबरी )

( जी. के. ऐनापुरे यांची ही पहिलीच कादंबरी.

स्वतःच्या आयुष्यातला संपूर्ण भूतकाळ मागे टाकून नव्याने आपल्या जगण्याच्या अवकाशात तपशील भरणाऱ्या आणि तरीही या अवकाशातल्या कारपणाची जाणीव जगणाऱ्या स्थलांतरित चंदरची ही कहाणी.
मी कोण आहे ? याचं अगदी प्राथमिक उत्तर 'मी माणूस आहे' असं देता येतं आणि 'माणूस असणं' याचा अर्थ जगण्याच्या प्राथमिक गरजांसाठी 'झगडणं' आलंच! चंदर असा झगडत झगडत, धडपडत धडपडत स्वतःच्या भौतिक जगण्याला अत्यंत प्रामाणिकपणानं प्रस्थापित करीत चाललाय आणि जगता जगताच अस्तित्वाचे नवनवीन अर्थही त्याला कळू लागलेत. सर्वांत असूनही एकाकी असणं, भोवतालच्या कोलाहलात स्वतःचा आतला आवाज शांतपणे ऐकत राहणे, ही त्याची वृत्तीवैशिष्ट्ये.
चंदर साईनबोर्ड पेंटींग्ज करणारा एक तरुण. कलावंताची दृष्टी असलेला आणि कारागिरीचा व्यवसाय करणारा. निर्मितीचा व्यवहार आणि व्यवहारातील निर्मिती यांचा ताळमेळ आणि त्यापायी होणारी घालमेल.... समजणे उमजणे, कळणे न कळणे, मिळणे न मिळणे यातल्या अनेक, आडवाटेवरच्या येरझाऱ्या ! शेवटी आपले असणे म्हणजे काय ? आणि नसणे म्हणजे तरी काय ?.... एक मोठा चक्रव्यूह ! आत घुसता येईल. पण बाहेर कसं पडायचं ?....
आजचे एक तरुण आणि समर्थ समकालीन कथाकार जी. के. ऐनापुरे यांची प्रकाशित होणारी 'अवकाश' ही पहिली कादंबरी. एका निश्चित अशा अर्धनागर, अर्धग्रामीण परिसरातल्या सर्वांगानं बदलत्या वास्तवाचा समंजस वेध घेत घेत आस्तित्वाच्या मुलभूत प्रश्नांपर्यंत पोहोचण्याचं सामर्थ्य दाखवणारी ही कादंबरी. एका उपेक्षित विषयामुळे तर नाविन्यपूर्ण आहेच, पण त्यापेक्षा महत्त्वाचे म्हणजे तिचे आशयद्रव्य मोलाचे आहे.
- अविनाश सप्रे )
०००

७)सकाळचे ऊन- बाळ गाडगीळ : ( दुर्मीळ पुस्तक , प्रकार- ललितलेखसंग्रह, लघुनिबंध, साहित्यविषयक, आठवणी, सदर लेखन )

( 'सकाळचे ऊन' मधील लेख हे म्हटले तर लघुनिबंध आहेत. म्हटले तर 'गुजगोष्टी' आहेत. शिवाय शिळोप्याच्या गप्पाही आहेत.
प्रासंगिक असे फार थोडे लेख या संग्रहात असतील. त्यामुळे त्यातला ताजेपणा आणि रसरशीतपणा वाचकांना जाणवावा. या लेखनालाही गाडगीळांच्या इतर लेखनाप्रमाणे विनोदाची झालर, किनार वगैरे नाही. झालर किंवा किनार वस्त्रात चिकटविलेली, उसनी असते. या लेखातला विनोद त्या लेखनाशी एकरूप झालेला असाच आहे. त्यामुळे त्यात कुठेही कृत्रिमपणा जाणवणार नाही. तसेच या विनोदात भडकपणाही नाही. सौम्य, सहजसुंदर विनोदाची पखरण या सकाळच्या उन्हात सापडेल. नाहीतरी सकाळचे ऊन ऊबदारच असावे, भाजणारे असू नये. मऊमऊ शालीप्रमाणे आपणाला हे ऊन आपल्याभोवती लपेटता यावे. आणि निसर्ग जसा उग्र, रौद्र, भयानक असू शकतो तसेच त्याचे एक शालीन, मार्दवयुक्त असे रूपही असू शकते हे थंडीतल्या कोवळ्या उन्हातच आपल्याला जाणवावे.
या लेखनात कुठलेच चिरकालीन सत्य वगैरे सांगितलेले नाही. कारण तसे काहीच अस्तित्वात नाही. नसते. येथे सापडेल ते माणसाच्या स्वभावातील वैचित्र्याचे आणि वैविध्याचे दर्शन आणि यातून निर्माण होणाऱ्या अनेक गमतीजमती. )
०००

८)विस्तारलेलं क्षितिज- संपा. डॉ. हे. वि. इनामदार/ डॉ. अंजली सोमण: ( दुर्मीळ पुस्तक, प्रकार- मराठी लेखिकांच्या निवडक कथा, संपादन )

दुसर्‍या आवृत्तीच्या निमित्ताने-
‘विस्तारलेलं क्षितिज' ची दुसरी आवृत्ती निघत आहे, हा आमच्या दृष्टीने अतिशय आनंदाचा योग आहे. १९७९ साली हे पुस्तक प्रसिद्ध झाले, तेव्हा स्त्रियांच्या कथालेखनाचा स्वतंत्रपणे विचार करणारे ग्रंथ (एखादा अपवाद सोडता) मराठीत उपलब्ध नव्हते. किंबहुना असा स्वतंत्र अभ्यास करण्याची काही आवश्यकता नाही, असे प्रतिपादन करणाराही एक वर्ग होता. असे असतानाही हे पुस्तक त्या वेळी आम्ही संपादित करायचे ठरवले. याची कारणे दोन. एक तर, मराठीत स्त्री-कथाकारांनी घातलेली भर मोलाची आहे. वाङ्मयेतिहासात किंवा अन्यत्र पुरुष कथाकारांच्या गर्दीत स्त्री-कथाकारांची, त्यांच्या गुणवत्तेची योग्य ती दखल घेतली जात नाही, हे लक्षात आले होते.
दुसरे कारण सामाजिक आहे. ते असे की, भारतासारख्या स्त्री-पुरुष विषमता पिढ्यान् पिढ्या मानणाऱ्या समाजात स्त्रियांचा स्वतंत्र असा (बव्हंशी उपेक्षित राहिलेला) गट तयार होतो. प्राप्त परिस्थितीत या गटाची स्वतःची अशी मानसिकता तयार होते. ही पुरुषांच्या कथांपेक्षा स्त्रियांच्या कथांतून वेगवेगळ्या बाजूंनी आणि अधिक सूक्ष्मपणे व्यक्त होते, असे आम्हाला वाटते. या दृष्टीनेही स्त्रियांच्या कथालेखनाचा एकत्रित विचार होणे गरजेचे होते.
मात्र संग्रहासाठी कथा निवडताना केवळ स्त्रियांच्या समस्या मांडणाऱ्या कथा निवडल्या नाहीत, तर सौंदर्यपूर्ण आकृतिबंध दाखवणाऱ्या, कथेच्या विकासाच्या नव्या शक्यता सूचित करणाऱ्या कथाही आम्ही निवडल्या. जेणेकरून स्त्री-कथाकारांची वाङ्मयीन बलस्थानेही लक्षात यावीत व हा अभ्यास 'वाङ्मयीन-सामाजिक' व्हावा.
१९८० ते १९९० या दशकात मराठी कथासाहित्यात स्त्रियांनी घातलेली भरही पूर्वीच्या कालखंडाप्रमाणेच महत्त्वाची आहे. हा संग्रह परिपूर्ण व अद्ययावत् होण्याच्या दृष्टीने या दशकातील महत्त्वाच्या स्त्री-कथाकारांच्या तीन कथा आम्ही दुसऱ्या आवृत्तीसाठी निवडलेल्या आहेत. या निवडीमागे अर्थातच वर उल्लेखिलेलीच भूमिका आहे. )

९)ऑक्टोपस- लक्ष्मीकांत देशमुख: आऊट ऑफ प्रिन्ट पुस्तक, प्रकार- सामाजिक कादंबरी)

( लक्ष्मीकांत देशमुख हे नाव आता मराठी वाचकांना सुपरिचित झाले आहे. इन्किलाब विरुद्ध जिहाद, अंधेर नगरी, पाणी! पाणी!!, मराठवाडा मुक्ती संग्राम ही त्यांची गाजलेली पुस्तके उच्च सनदी अधिकारी या अनुभवातून साकारलेली 'ऑक्टोपस' ही त्यांची नवी कादंबरी.
ऑक्टोपस' हे भ्रष्टाचाराचं प्रतिक. त्याची टेंटॅकल्स जसे भक्ष्याला विळखा घालून जखडतात, तसं आज भ्रष्टाचारानं अवघं भारतीय समाजजीवन जखडून टाकलं आहे. या भ्रष्टाचाररूपी ऑक्टोपसच्या विळख्यातून कसं सुटायचं हा एक यक्ष प्रश्न आहे. असा प्रयत्न करणारा व स्वच्छ आणि निस्पृह प्रशासन करणाऱ्या मुठभरांना ही भ्रष्टाचाराची व्यवस्था एवढी जेरीस आणते की, एकतर ते वैफल्यग्रस्त होत बाजूस होतात किंवा निरुपायानं त्या यंत्रणेशी मिळवून घेत त्याचा भाग बनतात आणि भ्रष्टाचाराचं वर्तुळ पुन्हा पूर्ण होत जातं. ऑक्टोपसचा विळखा अधिक करकचून आवळला जातो. महसूल यंत्रणेत काम करणारे व नीतिमूल्य मानणारे दोन अधिकारी एक अधिकारसंपन्न कलेक्टर व एक केवळ काम करणे आणि वरिष्ठांचे व भ्रष्ट समाजाचे राग, लोभ झेलण्याचा व थपडाच खाण्याचा अधिकार असलेला तलाठी यांच्या जगण्याची, मोह व संघर्षाची आणि भ्रष्टाचाराशी लढा देताना अंतिमतः पराभूत होण्याची ही कादंबरी म्हणजे 'ऑक्टोपस'. ती वेगवान घटना, वास्तववादी पात्रे व मूलगामी समाजचिंतनानं रंजक, वाचनीय व त्याचबरोबर उद्बोधक झाली आहे. मराठी साहित्यात गाव, तालुका व जिल्हा पातळीवरील शासकीय यंत्रणेचा भ्रष्टाचार व त्यात अडकलेली माणसे यांचं एवढं थेट, धीट व भेदक चित्रण प्रथमच या कादंबरीद्वारे आविष्कृत होत आहे. जगण्यात नैतिकता पाळणाऱ्या प्रत्येक सुजाण व्यक्तीनं ही कादंबरी वाचलीच पाहिजे, एवढं त्याचं प्रासंगिक व चिरंतन मूल्य आहे.)
०००

१०)मुरलीधर गंधे: एक अनिकेत- संपा. वा. रा. सोनार: (दुर्मीळ पुस्तक, प्रकार- व्यक्तिदर्शन, गौरवग्रंथ, वाचन, ग्रंथालय चळवळीचाइतिहास, मराठी साहित्याचा इतिहास)

( श्री. मुरलीधर गंधे हे खानदेशातील एक समाजवादी - शीलाचे व्यक्तिमत्व. आचरणाने संपूर्णपणे गांधीवादी वृत्तीचे अनासक्त, अपरिग्रहाचा आजच्या काळातील दुर्लभ वारसा जतन करून असलेले काका गंधे यांचे तसे लौकिक एकाकी जीवन संपूर्ण सार्वजनिक कार्यात व्यतीत झालेले.
गेली काही तपे त्यांनी स्वतःस ग्रंथालयीन चळवळीस वाहून घेतले आहे. एकनिष्ठेने एकादेच कार्य करीत राहाणे हे आजच्या काळात दिसणारे दुर्मिळ चित्र. तथापि श्री. काका गंधेंनी अंगिकृत कार्यांत आयुष्याचा होम करून झोकून दिले आहे. तशा या चळवळीचा लोक-जीवनावर ठसा उमटणेही अशक्म प्रसिद्धीच्या झोतात एकवेळ माणसे काही काळ तरी कामात रंगून जातात. त्याचीही इथे शक्यता नाही.
ग्रंथालय चळवळ तशी उपेक्षित सुसंस्कृततेसाठी प्रसिद्ध असलेल्या महाराष्ट्रातही या चळवळीचे स्वरूप असावे तितके सुदृढ नाही. अशा स्थितीत श्री. काका गंधेसारखी माणसे एकाकीपणे जी धडपड करीत आहेत, त्यास तोड नाही
या ' प्रणामा 'त व्यक्तीवर फारशी चर्चा होऊ नये अशी काकांची मनापासून इच्छा. आणि या त्यांच्या आर्त इच्छेच्या आड येण्याचे आम्हासही कारण नाही. म्हणूनच या ग्रंथाचे स्वरूप दुहेरी ठेवण्याचा प्रयत्न होता. अर्थात् याच्या स्वरूपसिद्धीसाठी त्या त्या व्यक्तींचे, संस्थांचे सहकार्य आवश्यक होते.
ग्रंथालय चळवळीशी, ग्रंथ-व्यवहाराशी हा ग्रंथ, संदर्भ-ग्रंथ ठरावा अशी काकांचीही इच्छा. त्यानुसारच या ग्रंथाचे स्वरूप निश्चित करून आम्ही संकल्प सोडला. मित्रांना निमंत्रणे दिली, आर्जवे केली आणि श्री. गंधे काकांच्या आयुष्याची ओळख असलेल्या सर्व स्नेहयांनी अत्यंत उत्कटपणे सहकार्य दिले त्यामुळेच हा ग्रंथ एकाचवेळी ग्रंथ-व्यवहाराविषयी अनेक विषयांवर चर्चा करणार संदर्भ - ग्रंथ होऊ शकला. त्याचवेळी 'श्री. मुरलीधर गंधे या व्यक्तीविषयीही अधिक प्रांजळ भावना व्यक्त करणाराही ठरला आहे.)
०००

११)सहवासातील साहित्यिक- प्रा. रमेश तेंडुलकर:
(प्रथम आवृत्ती २०००, प्रभात प्रकाशन, प्रकार- व्यक्तिचित्रे, व्यक्तिदर्शन, आठवणी, किस्से, साहित्यविषयक, साहित्यिक, कलाकार, खेळाडू )

( प्रा. अनंत काणेकर, अत्रे, वा. ल. यांच्यापासून अमिताभ, सचिनसह नितीन तेंडुलकरपर्यंत प्रा. तेंडुलकरांनी अनेकांच्या आठवणी आत्मीयतेने व जिव्हाळ्याने लिहिल्या आहेत. या व्यक्तींमध्ये काही व्यक्ती का आल्या नाहीत? उदा. वसंत सावंत, केशव मेश्राम, चंद्रकांत बांदिवडेकर, कृ. रा. सावंत, वि. शं. चौगुले, गंगाधर पाटील, विजया राजाध्यक्ष, वसंत बापट, विश्वास पाटील, एकनाथ साखळकर इत्यादी. शांताबाईंवर तर त्यांना दीर्घलेखन करायचं होतं आणि त्याबद्दल ते बोललेही होते. पण हे त्यांच्याकडून राहून गेलं. या व्यक्तींबद्दल त्यांना आस्था होती, ओढ होती, आपुलकी होती. त्यांची जवळीकही होती. पण ठरवून लेखन करणं हा त्यांचा स्वभावधर्मच नव्हता. या पुस्तकातील लेख निमित्ताने लिहिले गेलेत, असं सरळ दिसून येतं. रा. भि. जोशी निवृत्त झाले म्हणून, काणेकर, अत्रे, पुंडलिक गेले म्हणून, तर विंदा, पाडगावकरांनी साठीत प्रवेश केला म्हणून, अशी काही ना काही कारणं त्या लेखांच्या मुळाशी आहेत. जे काही लेख आहेत, त्यातही एका संवेदनशील कविमनाचं मनोज्ञ दर्शन घडतं.
कुसुमाग्रजांना भेटल्यानंतर तेंडुलकर त्यांना वाकून नमस्कार करतात, तेव्हा ते आपल्या आदरणीय माणसाबद्दलची ओतप्रोत भरून राहिलेली भावनाच उभी करतात. "पुंडलिकांच्या अनेक कथांमध्ये लहान मुलं येतात. त्यांच्या दिवंगत मुलाची - आशूची - आठवण चाळवली. जाणार नाही अशा बेताने, अशा खुबीने त्यांच्या या कथांची चर्चा आपण करायची,” असं मनात तेंडुलकर ठरवतात, तेव्हा एका वडिलांच्या दुखऱ्या मनाला जपणारा मित्र केवळ तिथे तेंडुलकरांमध्ये उरत नाही, तर मनाने नाजूक झालेल्या आणि उभारी घेऊ न शकणाऱ्या विकलांग माणसाच्या मनाच्या गाभाऱ्यात प्रवेश करून सांभाळू पाहणाऱ्या मोठ्या मनाच्या समजूतदार माणसाचं दर्शन आपल्याला होतं. अत्र्यांनी पत्नीच्या निधनानंतर तेंडुलकरांचं तीन महिन्यांनी सांत्वन केल्यावर ‘भडभडून’ येणारे तेंडुलकर आणि अत्र्यांनी ती घटना लक्षात ठेवली होती या जाणिवेनेही 'मन गलबलून’ जाणारे तेंडुलकर किती 'तुटलेपण' भोगत होते हे लक्षात आल्याशिवाय राहत नाही. १३ जूनला अत्रे गेले. १३ मेला तेंडुलकरांची आजी गेली. “माझ्या वैयक्तिक जीवनात ती घटना मला एका युगान्तासारखी वाटली. कुठेतरी माझ्या मनाची क्षितिजं संकोचली जात आहेत असं वाटलं,” असं एकाकी दुःख सोसणारे तेंडुलकर आपल्याला भेटतात. 'भो पंचम जॉर्ज’ पाठ्यपुस्तक मालश्यांच्या घरी कितीतरी वेळ मनोमन कुरवाळणारे तेंडुलकर पुस्तकाबरोबरच्या शालेय आठवणींनी हळुवार होतात. मुलांच्या भविष्याच्या काळजीने गंभीर, बेचैन होणारे वडील तेंडुलकर कोणत्याही मुलाला हेवा वाटावा असेच लख्ख प्रकट होतात. अमिताभ मृत्यूच्या छायेत ब्रीच कँडीला तळमळत असताना अस्वस्थ होणारे तेंडुलकर आणि देशपांडे नावाचा बालमित्र आता कुठे असेल या विचाराने तळमळणारे तेंडुलकर नातेसंबंधाची एक वेगळीच मर्मबंधातली ठेव समोर उघडी करतात. हे सारेच प्रसंग मोठे मनोज्ञ आहेत.
तेंडुलकरांनी लिहिलेल्या या व्यक्तिचित्रांचं एक वैशिष्ट्य म्हणजे त्यांची तल्लख स्मरणशक्ती.
०००

📨पोस्टेज वेगळे.

📞संपर्क क्रमांक :-
Book Roof Online Book Store:-
+91 87998 21809, पुणे .

⚠️महत्वाची सूचना :-
(हा बुक रूफ चा एकमेव व्हॉट्स ॲप आणि संपर्क नंबर आहे. पुस्तके हवी असल्यास तसेच अधिक माहितीसाठी यावर मेसेज किंवा थेट संपर्क करावा. कमेंट मध्ये कोणीही मोबाईल नंबर देऊ नयेत, कृपया सर्वांनी ही काळजी घ्यावी ही विनंती. धन्यवाद)

Address

Pune
411030

Opening Hours

Monday 9am - 10pm
Tuesday 9am - 10pm
Wednesday 9am - 10pm
Thursday 9am - 10pm
Friday 9am - 10pm
Saturday 9am - 10pm
Sunday 9am - 10pm

Telephone

+918799821809

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Book Roof Online Book Store posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to Book Roof Online Book Store:

Share

Category