11/08/2023
खेकडा - रत्नाकर मतकरी
रत्नाकर मतकरी यांचा खेकडा हा गूढ कथासंग्रह एका मित्राने वाचण्यासाठी सुचवलं होत...एकंदरीत पुस्तकाविषयी आणि लेखकाविषयी आधीच जाणून असल्याकारणाने मी सुद्धा एका क्षणात हा कथासंग्रह वाचण्यासाठी म्हणून खरेदी केला..
जेमतेम 131 पानांच हे पुस्तकं वाचायला घेतलं आणि ते संपूच नये असं वाटू लागले.. त्यातील कथा या आपल्याला अगदी झपाटून सोडतात.. आणि वाचून झाल्यावर ती प्रत्येक कथा आपल्याला सर्वांना सांगावीशी वाटते हे विशेष.
सर्वात आधी पुस्तकाचे शीर्षक "खेकडा" ही कथा वाचून काढली..कथेचा शेवट त्याची बांधणी अगदी उत्कृष्ट म्हणजे आपण या कथेमध्ये हरवूनच जातो आणि बघता बघता नंतर मी अनुक्रमे कुणास्तव कुणीतरी, अंतराय, कळकीचे बाळ, पावसातला पाहुणा, शाळेचा रस्ता, ती, मी आणि तो, निमाची निमा, एक विलक्षण आरसा, अल्बम आणि तुमची गोष्ट या सर्व गोष्टी वाचून काढल्या.
पुस्तकात एकूण 11 कथा आहेत त्यातील कळकीचे बाळ, निमाची निमा आणि ती मी आणि तो या अश्या काही कथा आहेत ज्यावाचल्यावर आपल्या तोंडातून आपोआपच अफलातून हा शब्द बाहेर येतो.
प्रेयसीसाठी आपल्या खेकड्याप्रमाणे वावरणारी पोलियो ग्रस्त मुलीला मारणे किती जिकीरचे आहे हे खेकडा कथेत जाणवते, इथे आपल्याला प्रेयसीची चीड येते कारण आपण इथे आजाराला सहनशक्तीची कड ह्या भूमिकेतून पाहतो- ह्या कथेत प्रेयसी विरुद्ध मुलगी हे तुलनात्मक विश्लेषण फार वेगळे ठरते.
कुठल्यातरी मुलाला धरून भिकेला लावणे त्यातून त्याला अश्या जागी बसवणे जिथे एक म्हातारी धड मरत पण नाही धड जगत पण नाही त्यातून एक अनामिक हुरहूर त्या मुलाच्या मनात चाललेली, म्हातारी जगली पाहिजे कारण ती जगली तरच भिकेत पैसे जास्त मिळतील हा उद्देश्य, आणि मरताना म्हातारी एकदा डोळे उघडहून त्या मुलाकडे बघते आणि "कुणास्तव कुणीतरी" कथा इथे जिवंत होते.
आपल्या प्रेयसीच्या मरणानंतर तिच्या नवऱ्याच्या मनात मेलेल्या बायको विरुद्ध विष पेरणारा प्रियकर आणि मित्र ह्यात समाजातली विकृत माणसे कसे असतील हे "अंतराय" कथेत मांडले आहे, ही संपूर्ण कथा "पत्र फॉरमॅट" मध्ये पुढे सरकत जाते.
पण मला आवडलेली आणि अतिशय अंगावर येणारी कथा म्हणजे "कळकीचे बाळ" , बाळ नसणारी आईला ज्या वेळी बाळ होतं आणि अतिशय विकृत - बेढंगी बाळ निपजते, आणि नंतर तेच बाळ त्याच आईला मृत्यूच्या काळात कसे गडप करते ही कथा आपल्याला खिळवून तर ठेवतेच पण त्याच सोबत कथेचा वस्तुपाठ कसा असावा ह्याकडे मी आपले लक्ष निर्देशित करते.
इतिहासात एक जुन्या राजवटीत डोकावणारी "पावसातील पाहुणा" कथा अप्रतिम आहे. टेलीपॅथी ह्या एका शास्त्राच्या आधारे "शाळेचा रस्ता" कथा खुलत जाते.
माणूस खून का करतो पासून सुरु झालेली "ती, मी आणि तो" अत्यंत छोटी कथा रंजकरित्या फुलत जाते.
लहानपणी मुलं सगळ्यात जास्त रमतात ते त्यांच्या बाहुली - गाडी यासम खेळण्यात, मुलांसोबत जसे आपण वागू तसे ते त्या खेळण्यांसोबत वागतात, बालमानास शास्त्र किती महत्वाचे आहे हे ह्या "निमाची निमा" ह्या कथेतून अधोरेखित होतं जाते, एक वेगळा प्लॉट असलेली आणि वेगळी उंची गाठलेली ही कथा.
अपंग मुलीच्या वैरण आयुष्यात उदासीनता काठोकाठ भरलेली असताना त्या उदासीनतेचे जिव्हार आणि दंश तिच्या अभिनेत्री बहिणीला कमी करता येत नाहीसमोर एक वेगळा आरसा असताना आपण किती सुंदर आहोत हे अपंग मुलीला जाणवते ती हळू हळू सुधारते आणि एकाएकी कोसळून पडते त्यावेळी जाणवते कि आरसा दुभंगला आहे. जुन्या विक्रम वेताळाच्या कथेप्रमाणे आल्बम ही कथा आहे,
एकाच घरातले माणसे भराभर अपॉईनमेंट असल्या सारखी मरू लागली. शेवटी साधारण आयुष्य चाल-ढकल करणाऱ्यांच्या आयुष्यात खुनांची आणि गुन्ह्यांची मालिका रचली जावी, इतकी क्रूर थट्टा आयुष्याने का करवून घ्यावी...शेवटी काय "तुमची म्हणून सांगितलेली ही गोष्ट तुमची नव्हेच. एक आपली एक शक्यता सांगितलेली एवढेच".
एकंदरीत पुस्तकातील प्रत्येक गोष्ट आपल्याला खोल विचार करायला लावते आणि कायमस्वरूपी लक्षात राहते, प्रत्येक कथेचा शेवट हा वाचकाला आपली बोटे तोंडात घालायला भाग पाडतो आणि त्या गोष्टीच नाव किती बरोबर योग्य आणि समरस आहे याची आपल्याला खात्री पडते...हीच जादू आहे रत्नाकर मतकरी यांच्या लेखणीत जी आपल्याला पुस्तकं वाचताना आणि अनुभवताना प्रकर्षाने जाणवते.
तुम्हाला गूढ कथा आवडत असतील तर हा कथासंग्रह म्हणजे तुमच्यासाठी उत्तम मेजवानीच आहे असं समजा आणि लगेच वाचायला घ्या.
आणि तुमच्या आवडीचा असा एखादा गूढ कथासंग्रह असेल तर कमेंट मध्ये नक्की आम्हाला शेअर करा.