16/07/2023
*द ओल्ड मॅन अँड द सी*
प्रसिद्ध लेखक नोबेल पुरस्कार प्राप्त अर्नेस्ट हेमिंग्वे यांची लघुकादंबरी.
भाषांतर भरती पांडे.
मधुश्री प्रकाशन.
सन 1951 ला कादंबरीला मानाचा असा पुलित्झर पुरस्कार मिळाला.
त्यानंतर दोनच वर्षांनी लेखकाला साहित्यातील योगदानाबद्दल नोबेल पुरस्कार देण्यात आला. अनुभव संपन्न लेखकाच्या
दि सन आल्सो रायजेस,
अ फेअरवेल टू आर्म्स,
फॉर्म हूम टू द बेल टोल्स
इत्यादी
कादंबऱ्या तेवढ्याच प्रसिध्द आहेत.
द ओल्ड मॅन अँड द सी
लघुकादंबरी परंतु यातील आशय फार महत्त्वाचा आहे.
लेखकाला आलेले अनुभव त्यांनी आपल्या कादंबरीतून मांडलेले आहेत.
या कादंबरीतून लेखकाचा संदेश 'माणसाला उध्वस्त करता येऊ शकते परंतु पराभूत नाही' असा
आहे.
क्यूबा हवानातील समुद्राजवळ राहणाऱ्या सँटियागो या म्हाताऱ्या कोळ्याची ही गोष्ट आहे. सतत 84 दिवस म्हाताऱ्याला मासेमारीत विशेष यश आलेले नसतं. काही दिवस मनोलीन नावाचा पोरवयीन मुलगा त्याला साथ देतो. परंतु त्याचे वडील त्याला दुसऱ्या कोळ्याकडे पाठवतात. या दोघांचं अनोखं असं नातं आहे. दोघांचाही एकमेकांवर जीव आहे.
म्हाताऱ्या कोळ्याची त्याचे मित्र टिंगल करतात आणि तो चेष्टेचा विषय बनतो परंतु म्हातारा अनुभवी असतो. एके दिवशी तो मासेमारीसाठी जायला निघतो तेव्हा मनोलीन त्याची चांगली सेवा करतो. त्याची पूर्ण तयारी करून देतो.
म्हातारा आपली होडी घेऊन मासेमारीला निघतो. सुरुवातीला त्याच्या गळाला एक दोन छोटे मासे लागतात, त्यावर तो आपली गुजराण करतो.
आणि अचानक त्याच्या गळाला हिसका बसतो. त्यावरून अनुभवी म्हातारा जाणतो, की ही मोठी शिकार आहे. त्याच्या लक्षात येतं हा मासा ओढणं आपल्याला शक्य नाही, त्यावेळेस तो त्याच्या अनुभवाचा वापर करून त्याच्या जवळील असणारे दोरखंड वापरून आणखी ढील देत राहतो. आणि मासा ज्या दिशेला(खोल समुद्राच्या दिशेने) नेईल त्या दिशेला तो जात राहतो.
दुसऱ्या दिवशी सकाळी मर्लिन नावाचा मासा त्याला आपला दर्शन घडवतो. तो मासा बघून चकित होतो. असा मासा आयुष्यात बघितला नाही याची त्याला जाणीव होते.
निसर्ग आणि माणूस यातील सहयोगिता लेखकाने वर्णन केलेली आहे.
म्हाताऱ्याचा निसर्गाकडे बघण्याचा दृष्टिकोन हा सकारात्मक आहे.
तो माशाला सुद्धा भाऊ मानतो. समुद्राला स्त्री ची उपमा देतो. लहान पक्षांची त्याला कीव येते. पेंगुळल्याल्या अवस्थेत तो तरुणपणाची आणि सिंहाची स्वप्न बघतो.
तो म्हणतो मला प्रयत्न केलेच पाहिजे. माणसाच्या अपार अतृप्तते बद्दल सुद्धा तो भाष्य करतो. त्याचं हे बोलणं स्वगत म्हणजे स्वतःशी केलेला संवाद आहे. आणि सरते शेवटी तो त्या मरलीन माशाला पकडण्यात यशस्वी होतो. त्यासाठी तो प्रयत्नांची पराकाष्टा करतो. आपल्याजवळ असलेला अनुभव आणि प्रसंगावधान याचा वापर करून तो माशाला जेरबंद करतो. मासा एवढा मोठा असतो की तो त्याच्या होडीत बसू शकत नाही, अशा वेळेस तो माशाला
दोरखंडाने होडीला बांधतो आणि परत जायला निघतो. अशा वेळेस त्याला दुरून शार्क माशाची जोडी दिसते.तो मुकाबला करायला तयार होतो आणि त्या दोन शार्क माशांना मारून त्यांचा हल्ला परतवून लावतो. यामध्ये त्याचा भाला तुटतो.
परंतु माशाचे रक्त आणि त्या शार्क माशांच्या रक्ताने इतर शार्क माशांचा समूह त्या माशाचे लचके तोडायला येत राहतो. म्हातारा जवळ असलेल्या अपुऱ्या शस्त्रानिशी रात्रीच्या अंधारात त्या शार्कसमूहासोबत झुंजतो. मर्लीन माशाचा शार्क मासे फन्ना उडवतात.
शार्क मासे जेव्हा मरलीन माशाचं डोकं खायला लागतात तेव्हा अनुभवी कोळ्याच्या लक्षात येतं की मासा संपलेला आहे.
अशा रीतीने दोन दिवस दोन रात्रीचा हा थरार संपतो. थकलेला म्हातारा आपल्या झोपडीत जाऊन झोपतो. दुसऱ्या दिवशी सकाळी इतर लोक गोळा होतात आणि मरलीन माशाचा सांगाडा बघून अचंबित होतात.
तो मुलगा त्या झोपडीत जातो आणि म्हाताऱ्याची अवस्था बघून ढसाढसा रडतो .म्हाताऱ्यांचे हात बघून त्याला खूप दुःख होते. तो त्याला कॉफी पाणी देतो.
म्हातारा त्याला म्हणतो मी हरलो परंतु तो मुलगा म्हणतो ,'तू हरला नाहीस तर तू जिंकलास' आणि यापुढे मी तुझ्यासोबत येईल आणि तुझ्या अनुभवाचा मला नक्कीच फायदा होईल.
'म्हाताऱ्याचा अनुभव आणि तरुणाचा उत्साह यातून असाध्य ते साध्य होऊ शकतं' असाच संदेश लेखकाला द्यायचा असावा'.
कादंबरीचे भाषांतर सहज आहे
*पुस्तक मित्र मधुसूदन.*