20/03/2022
'शेतीजन्य प्रस्तुत द्राक्ष महोत्सव'
असं म्हणत कृषी उत्पादन विक्री उपक्रमाला आज एक वर्ष पूर्ण झाले. शेतीजन्यचा जन्म करोनाच्या टाळेबंदीत वृत्तसंकलन करत असताना झाला. मुरबाड तालुक्यातही हापूस आंबा पिकतो आणि तोही दर्जेदार हे २०२० मध्ये पहिल्यांदा समजलं. टाळेबंदीत महामार्ग बंद असल्याने आंबा विक्री ठप्प आहे. त्यामुळे फक्त बातमी करू नका साहेब, आंबा विकायला मदत करा अशी भावनिक विनंती नथ्थू पारधी यांनी केली. हे ऐकून आम्ही चारही पत्रकार पेटून उठलो. चंद्रशेखर भुयार सरांनी त्या शेतकऱ्याचे आवाहन करणारा व्हिडीओ चित्रित केला, प्रशांत मोरे सरांनी भावनिक पोस्ट लिहली. मी आणि गिरीश त्रिवेदी यांनी ही पोस्ट व्हायरल केली. मग अंबरनाथ, बदलापूर, मुरबाड, कल्याण, डोंबिवली अशा सर्व शहरातून भरभरून मेसेज येऊ लागले. आंबे हवेत, कोणते आहेत, मदत करायची आहे, पत्ता द्या असे अनेक मेसेज आले. मग जबाबदारी वाढली. मग आंबे द्यायचे कसे याबाबत सर्व चर्चा करू लागलो. मग ठरलं की बाजारात ज्याप्रमाणे हापूस विकला जातो तसाच विकायचा. मग खोका कंपनी शोधली. टाळेबंदीत सर्व बंद असताना ते शोधायचे कुठे हा प्रश्न होताच. उल्हासनगर शहर अशा सर्व मागणीला कायमच पुरून उरत असतं. वरप गावात असलेल्या खोका कंपनीचा संपर्क मिळाला. या सिंधी बांधवानेही आदिवासी बांधवांना तात्काळ मदत करण्यासाठी बॉक्स तयार करून देण्याची तयारी दर्शवली. त्या काळात बाजार बंद असल्याने मागणी घटली होती. अशावेळी मोजक्या ऑर्डर घेणे परवडत नव्हते. मात्र यात व्यवसाय नव्हता, त्यामुळे त्यांनीही दरात कपात करून बॉक्स दिली. स्वतःची आंब्यांची ऑर्डरही दिली. दिवस ठरला आणि आम्ही जयंत कदम यांचा टेम्पो घेऊन मुरबाडच्या फांगणे जवळील करपटवाडी या आदिवासी वाडीत पोहोचलो. बॉक्समध्ये आंबे भरण्याचा अनुभव ना आम्हाला होता ना पारधी कुटुंबियांना. पण ज्याप्रमाणे आपल्याला आंब्याची पेटी मिळते तशीच आपण द्यायची हे ठरवलं होतं. आंब्याच्या पेट्या खूप उघडल्या, पण पहिल्यांदाच पेट्या भरायच्या होत्या. मग काय झोपडीवजा कौलारू मातीच्या घरात सर्व अविर्भाव घडी करून बसकन मारली. डझनाच्या हिशेबाने पेट्या भरल्या. दुपारी ११ ला सुरू झालेले काम सायंकाळी ५ च्या सुमारास संपले. पेट्या भरल्या, टेम्पोत टाकल्या आणि वेळ आली पेट्यांचा हिशेब देण्याचा. व्यापारी नसल्याने आणि भावनिकतेतून हा उपक्रम करत असल्याने सर्व आंब्याचे पैसे आगाऊ द्यायचे ठरवले होते. त्यासाठी यथाशक्ती खिसा रिकामा केला होता. आदिवासी बांधवांचे सुमारे अडीचशे पेट्या म्हणजे हजार किलो आंबे एकाच दिवसात विकले गेले होते. जवळपास दोन महिने कल्याण अहमदनगर राज्यमार्गावर भर उन्हात रस्त्याच्या कडेला बसून आंबे विक्री करणाऱ्या पारधी कुटुंबासाठी हा वेगळाच व्यवहार होता. त्यांनी आयुष्यात एवढी रक्कम एकावेळी पाहिली किंवा स्वीकारली नव्हती. त्यांच्या चेहऱ्यावर खूप काही मिळाल्याचा जो आनंद दिसला तो अवर्णनीय असा होता. त्यांचे चेहरे पाहून जे समाधान मिळाले ते शब्दात वर्णन करता येऊ शकत नाही.
टेम्पो घेऊन सायंकाळी अंबरनाथ गाठले. गिरीश त्रिवेदी यांचे घर शहराच्या मध्यवर्ती भागात असूनही ऐसपैस आहे. त्यांच्याच घरी पेट्या उतरवल्या. दुसऱ्या दिवसापासून वितरण सुरू झाले. अवघ्या एका दिवसात सर्व पेट्या हातोहात खपल्या. ना नफा ना तोटा संकल्पनेतून राबवलेला आदिवसींसाठीचा हा उपक्रम यशस्वी झाला.
या उपक्रमाला अंबरनाथ, बदलापूर, कल्याण, डोंबिवली, उल्हासनगर अशा सर्व शहरातील सुजाण ग्राहकांनी प्रतीसाद दिला. त्यानंतर २०२१ या वर्षात दोन ते तीन जातींचे आंबे मोठ्या प्रमाणावर वितरित केली. अनेक जवळच्या व्यक्तीं मग त्या सर्वच क्षेत्रातील असो, सर्वांनी ही संकल्पना डोक्यावर घेतली. हे कायमस्वरूपी करावे असे सुचवले. काहींनी आग्रह केला, अनेकांनी आर्थिक पाठबळ देण्याची तयारी दाखवली. अनेकांनी जागा, वाहन देण्याची घोषणा केली. मात्र पत्रकारिता सांभाळून हे करता येईल का या संभ्रमात होतो. अखेर काही महिने गेल्यावर आणि जिल्ह्यातील शेती क्षेत्राशी जवळीक वाढल्याने अखेर हा उपक्रम नियोजनबद्ध आणि सातत्याने करण्याचे ठरले. आपल्या समूहाला एक नाव देण्याबाबत चर्चा सुरू झाली. प्रशांत मोरे सरांनी अचानक एके दिवशी चंद्रशेखर भुयार यांच्या गाडीतून फिरत असताना एक शब्द उच्चारला. 'शेतीजन्य'. कसे वाटते हे नाव.
अगदी दुसऱ्या मिनिटाला सर्वांनी शब्दाला मंजुरी दिली. आणि सुरू झाला *शेतीजन्य*चा प्रवास.
तालुक्यात, जिल्ह्यात आणि आसपासच्या भागात काय पिकते, काय विकते, कसली गरज आहे, काय अडचणी आहेत हे सर्व अभ्यासू लागलो. अंबरनाथ तालुका कृषी सहायक सचिन तोरवे आमचे प्रमुख मार्गदर्शक. वांगणीचे प्रयोगशील शेतकरी गणेश देशमुख, कृषितज्ज्ञ राजेंद्र भट, तत्कालीन कृषी अधिकारी, कृषी अधीक्षक आमचे कायम मार्गदर्शन करत राहिले. अशा अनेक व्यक्ती आहेत ज्या आमच्या पाठीशी या काळात उभ्या राहिल्या.
जानेवारी २०२१ मध्ये द्राक्ष महोत्सव करण्याची कल्पना सुचली. निर्यात बंद झाल्याने उत्तम दर्जाचा थॉम्पसन जातीचा द्राक्ष पडून असल्याची माहिती गणेश देशमुख यांनी दिली. त्यानुसार थेट नाशिक जिल्ह्यातील मोहाडी गाव गाठले. जाधव वस्तीत मयूर जाधव आणि कुटुंबियांची भेट घेतली. शेतकऱ्याकडे पैसा नसला तरी त्याचे मन खूप मोठे असते याचा प्रत्यय जाधव कुटुंबियांना भेटून आला. द्राक्ष बाग फिरून, द्राक्षांची चव चाखून हेच द्राक्षे शहरात विक्रीसाठी न्यायची हे ठरवलं. मग मयूर जाधव आणि त्यांच्या बंधूंची छोटेखानी मुलाखत करून परतलो.
एखादा महोत्सव करायचा म्हटलं की खर्च, नियोजन आणि मनुष्यबळ लागणारच. अशावेळी शहरातील प्रतिष्ठित व्यक्तींना यात सहभागी करण्याचा निर्णय झाला. बदलापूरात स्थानिक आमदार यांच्या उपस्थितीत कार्यक्रम करायचे ठरले. भाजपचे नगरसेवक आणि माजी नगराध्यक्ष राजेंद्र घोरपडे यांना ही संकल्पना सांगितली. क्षणाचाही विलंब न करता घोरपडे साहेबांनी जागा, दिवस आणि काय करायचं एवढं सांगा, अस बोलून कार्यक्रम निश्चित केला. बदलापुरात पश्चिमेला आणि पूर्वेला अशा दोन ठिकाणी कार्यक्रम ठरला. अंबरनाथ शहरात शिवसेनेचे नगरसेवक आमचे मित्र पुरुषोत्तम उगले, भाजपचे पदाधिकारी आणि मित्र सर्जेराव माहुरकर यांचे कार्यालय आणि गिरीश त्रिवेदी यांच्या घरून विक्री करायचे ठरवले.
२० मार्च, सकाळी दहाच्या सुमारास बदलापूर पश्चिमेतील सूर्योदय नगरच्या नाल्याजवल भव्य मंडपात आमदार किसन कथोरे यांच्या उपस्थितीत द्राक्ष महोत्सवाचे उदघाटन झाले. तासाभरात पूर्वेतील उड्डाणपुलाच्या खाली दुसऱ्या केंद्राचे उदघाटन झाले. दोन्ही ठिकाणी काही मिनिटातच सुमारे एक हजार किलो द्राक्ष संपली. संध्याकाळी अंबरनाथचे केंद्र सुरू होण्यापूर्वी बदलापुरात द्राक्ष संपली होती. संध्याकाळी पुरुषोत्तम उगले यांच्या कार्यालयात आमदार डॉ. बालाजी किणीकर यांच्या हस्ते महोत्सवाचे उदघाटन झाले. आणि काही तासातच अंबरनाथ शहरात सुमारे एक हजार किलो द्राक्षे तीन केंद्रावरून संपली. कल्याण, डोंबिवली या भागातील द्राक्ष पेट्या आम्ही स्वतः नेऊन पोहोचवल्या. एक दिवसात अडीच हजार किलो द्राक्ष संपली याचे आश्चर्य वाटत होते.
पण समाधान या गोष्टीचे होते की अडचणीत आलेल्या किमान एका द्राक्ष उत्पादक शेतकरी कुटुंबाला मदत केली. समाधान याचे होते की आपलं दरात निर्यात दर्जाची द्राक्षे आपल्या भागात उपलब्ध करून दिली.
गेल्या वर्षात सुरू झालेल्या शेतीजन्यच्या या प्रवासाला आज *एक वर्ष* पूर्ण होत आहेत. या प्रवासात आपल्या सर्वांची प्रत्यक्ष, अप्रत्यक्षपणे भरपूर मदत झाली. द्राक्षानंतर त्याचेच मनुकेही सुमारे ६०० - ७०० किलो विकले गेले. गेल्या दोन महिन्यात कोणतीही जाहिरात न करताही इंद्रायणी, आंबेमोहोर असा दर्जेदार आणि अस्सल तांदूळ वाजवी किमतीत उपलब्ध करून दिला. दर्जेदार शेती उत्पादन पुरवण्यासोबतच शेतीजन्यने अंबरनाथ, डोंबिवली या शहरांमध्ये सांस्कृतिक आणि वाचन चळवळीला हातभार लावण्यासाठी डॉ. श्रीकांत शिंदे फाउंडेशनच्या मदतीने सांस्कृतिक कार्यक्रम आणि पुस्तक प्रदर्शनही भरवले. अवकाळी पावसाने यंदाच्या द्राक्ष महोत्सवावर पाणी फिरवले. आर्थिक नुकसान झाले. पण आम्ही हरलो नाही. लवकरच शेतीजन्य आपले स्वतःचे नवे विक्री केंद्र अंबरनाथ शहरात सुरू करत आहे. येत्या काही दिवसात त्याचे लोकपर्ण होईल. शेतीजन्य आपल्या आसपासच्या शेती, शेतकरी, त्यांच्या कथा , व्यथा घेऊन संकेतस्थळ आपल्या भेटीला आणत आहे.
तर आजच्या शेतीजन्य समूहाच्या उपक्रम वर्धापनदिन दिवसाचे औचित्य साधून एक ते दीड वर्षांचा प्रवास मांडण्याचा प्रयत्न केला. आपण दिलेल्या शुभेच्छा आणि पाठींबा कायम ठेवा हीच विनंती.
धन्यवाद
सागर नरेकर, टीम शेतीजन्य
२०-०३-२०२२